मुंबई- कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सुमारे सव्वालाख आयुष डॉक्टरांना आठवडाभरात ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यात आवश्यक ती उपकरणे उपलब्ध असून सुमारे दीड हजार व्हेंटिलेटर, अडीच लाख एन ९५ मास्क उपलब्ध असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत एकमेकांमध्ये अंतर (सोशल डिस्टंसिंग) राखावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यात आरोग्य पथकांमार्फत क्लस्टर कंटेनमेंट कृति योजनेतून सर्वेक्षणाबरोबरच प्रत्यक्ष संपर्काचे काम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे नऊ लाख लोकांशी संपर्क करण्यात आला आहे. या कामासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आवश्यकता भासल्यास राज्यात आरोग्यसेवेसाठी पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ असावे यासाठी राज्यातील आर्युवदिक, युनानी, होमिओपॅथी या आयुष डॉक्टरांची सेवा घेता यावी याकरिता त्यांना आठवडाभरात कोरोनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आजच आयुषच्या २५० मुख्य प्रशिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण झाले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी उपकरणे आणि साधनसामुग्री आहे.
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सव्वालाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण